भाजपच्या ‘चकव्या’ने आ. अब्दुल सत्तारांची वाट चुकलेलीच; ‘घर का ना घाट का’ सारखी स्थिती

Foto

औरंगाबाद:  जिल्हा काँग्रेसचे बडतर्फ अध्यक्ष तथा आमदार अब्दुल सत्तार यांनी तावातावात काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर राधाकृष्ण विखे यांच्याशी संपर्क वाढवत त्यांच्यासोबत भाजपमध्ये जाण्यासाठी प्रयत्न केले. पण सिल्लोड, सोयगावातील भाजपच्या स्थानिक नेत्यांनी सत्तारांच्या प्रवेशाला विरोध केला. त्यामुळे सत्तारांचा भाजप प्रवेश लटकला. आता ते शिवसेनेच्या मार्गावर जाताना दिसत आहे. पण तेथेही त्यांच्या प्रवेशाचा मार्ग सुकर दिसत नाही. त्यामुळे आज तरी सत्तारांची स्थिती ‘घर का ना घाट का’ अशी झाली आहे. 

लोकसभा निवडणूक प्रसंगी औरंगाबाद व जालना लोकसभा मतदार संघात काँग्रेसचा उमेदवार देताना विश्‍वासात घेतले नाही. आपल्या इच्छेविरुद्ध आमदार सुभाष झांबड यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज झालेल्या सत्तारांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराविरुद्ध प्रचार केला. त्यानंतर सत्तार यांनी राधाकृष्ण विखेंसोबत भाजपात प्रवेशाचा प्रयत्न केला. पण त्यास भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी विरोध केल्याने प्रदेशाध्यक्ष व मुख्यमंत्र्यांची इच्छा असूनही सत्तारांना भाजपात प्रवेश दिला नाही. भाजपात प्रवेश मिळत नसल्याचे पाहून सत्तार यांनी आता शिवसेनेत प्रवेश मिळविण्याचा प्रयत्न सुरू केला असल्याचे दिसते. बुधवारी मुंबईत सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. पण स्थानिक पातळीवर सेनेच्या नेत्यांनी ही सत्तारांच्या प्रवेशाला विरोध दर्शविला आहे. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत सत्तार यांना अपक्ष म्हणूनच लढावे लागेल असे दिसते. काँग्रेसमध्ये असताना दलित, मुस्लिमही काँग्रेसची व्होट बँक त्यांच्यासोबत  होती. पण आता ही व्होट बँक सत्तारांच्या पारड्यात पडणार नाही. ही सर्व व्होट बँक वंचित बहुजन आघाडीकडे गेल्याचे दिसते. त्यामुळे अपक्ष म्हणून निवडणूक लढविणे ही सत्तारांसाठी सोपे राहिलेले नाही. सत्तारांपेक्षा त्यांच्या पाठिशी असलेल्या नगरसेवक जि.प. व पंचायत समितीचे सदस्य सर्वात जास्त परेशान झाल्याचे दिसते. सत्तार यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णयच काही कार्यकर्त्यांना आवडलेला नव्हता. पण नाईलाजाने स्थानिक राजकारण म्हणून ते सत्तारांसोबत आहेत. पण सत्तारांची सध्याची झालेली राजकीय कोंडी पाहून त्यांचे समर्थक पुन्हा काँग्रेसकडे वळण्याची शक्यता आहे. अद्याप एकाही जि.प. सदस्य व नगरसेवकाने काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेली नाही. अजूनही सर्व सत्तार समर्थक काँग्रेसचेच सदस्य आहेत. सत्तारांचे सर्व ठिकाणी पक्ष प्रवेशास होणारा विरोध पाहता सध्या तरी त्यांची स्थिती ‘घर का ना घाट का’ अशी झाली आहे.